औरंगाबाद - ग्रामीण पोलिसांना 21 वॉन्टेड आरोपी अटक करण्यात यश मिळाले आहे. तसेच 2015 पासून कोर्टाने समन्स बजावलेले 52 पैकी 3 आरोपीना पोलिसांनी अटक करताच तब्बल 45 आरोपी कोर्टात हजर झाले. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्हा सत्र न्यायालयाने ग्रामीण पोलिसांची पाठ थोपटली आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून कोंबिंग ऑपरेशन च्या माध्यमातून दारू बंदी, हॉटेल, अवैध जनावरांची वाहतूक आणि वॉन्टेड असलेले गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्यात आली. न्यायालयाचे वॉरंट असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले. पोलिसांच्या या शोधमोहिमेत 21 वॉन्टेड असलेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या मोहिमेत 2015 मधील न्यायालयात हजर न झालेल्या 52 आरोपी पैकी 3 आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहे.
2015 साली देवगाव रंगारी येथे ग्रामपंचायत मधे झालेल्या वादातून पोलिसांवर हल्ला झाला होता. या प्रकरणी 52 आरोपी जामिनावर होते. मात्र पुढील सुनावणीसाठी कोणतेच आरोपी न्यायालयात हजर होत नव्हते. मात्र एकाच रात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवित या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक करताच इतर 45 आरोपी स्वतःहून न्यायालयात हजर झाले. पोलिसांच्या या कारवाईचे कन्नडच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही कौतुक केले. ग्रामीण भागात अश्या प्रकारच्या आणखीन इतर योजना वापरून गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी सांगितले.