औरंगाबाद - शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, रेल्वेने मालवाहतूक काही प्रमाणात सुरू केली आहे. गुरुवारी (ता. ७) रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात भुसावळकडे पायी निघाले होते. मात्र, प्रवासातच त्यांचा करुण अंत झाला.
रेल्वे बंद असल्यामुळे गाडी येणार नाही या समजातून झोपले रुळावर
लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. मात्र सरकारने राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी विशेष श्रमिक गाड्यांची व्यवस्था केली आहे. काल (गुरुवारी) औरंगाबादहून भोपाळला एक विशेष गाडी रवाना करण्यात आली होती. आपल्यालाही अशाच एखाद्या गाडीने घरी परतता येईल या आशेने जालन्यातील हे मजूर रात्रीच औरंगाबादच्या दिशेने रेल्वे रुळावरूनच पायी निघाले. रेल्वे सेवा बंद असल्याने रुळावरून कोणतीच गाडी येणार नाही, या समजातून सर्व मजूर रुळावरच झोपी गेले, मात्र हा समजच त्यांच्या जीवावर उठला व हकनाक १६ मजुरांचा बळी गेला.
रस्त्यात करमाडजवळ रेल्वे पटरीवर रात्री त्यांनी आसरा घेतला आणि रेल्वे सध्या बंद आहे कुठलीही रेल्वे येणार नाही, असा समज असल्याने ते रेल्वे पटरीवर झोपले. जवळपास 17 जन रेल्वे पटरीवर झोपले होते. सकाळी सहाच्या सुमारास मालगाडी आली आणि या सर्व मजूरांना चिरडून निघून गेली.
दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान मोदींनीही दु:ख व्यक्त केले आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलणे झाले असून याप्रकरणी ते लक्ष ठेवून आहेत, असे ट्विट मोदींनी केले आहे.