औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर ऑनलाइन होणार आहेत. या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी पहिल्या दिवशी ६५ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिली आहे.
पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्च व ६ एप्रिलपासून सुरू करण्यात आल्या. मात्र, १५ एप्रिल ते २ मे यादरम्यान शासनाने निर्बंध घातल्याने सर्व पेपर स्थगित करण्यात आले. यानंतर मागील आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक पार पडली. पुढील सर्व पेपर हे ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी कोविडची सर्व नियमावली पाळून परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वच महाविद्यालयात आयटी को-ऑर्डिनेटर्सची संख्या दुप्पटीने वाढविली आहे. पदवीचे उर्वरित पेपर ३ मेपासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
संबंधित विद्यार्थ्याची २८ एप्रिल ते २ मेदरम्यान ऑनलाइन मॉक टेस्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी ६५ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिली आहे. चारही जिल्ह्यात परीक्षा यशस्वीपणे होत असून एकाही विद्यार्थ्यांची लेखी तक्रार परीक्षा विभागास प्राप्त झालेली नाही. काही अडचण आल्यास आपल्या महाविद्यालयाच्या आयटी को-ऑर्डिनेटर्ससोबत संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी केले आहे.