औरंगाबाद - शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर औरंगाबाद महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. मागील सहा दिवसात 448 लोकांवर कारवाई करण्यात आली असून जवळपास 2 लाख 24 हजारांचा दंड पालिकेने वसूल केला आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेने शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे सक्तीचे केले आहे. मास्क न लावणाऱ्याला पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसात सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत पालिकेचे कर्मचारी ही कारवाई करत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता औरंगाबाद महानगर पालिकेने काही उपाय योजना अंमलात आणल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असतानाही अनेक लोक मास्कचा वापर करत नसल्याचं आढळून येत होते. वारंवार विनंती करूनही किराणा दुकानात काम करणारे लोक, अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेले लोक मास्क लावत नसल्याचं दिसत होतं. त्यामुळे त्या लोकांसह इतरांना कोरोनाची लागण होण्याची भीती लक्षात घेता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी शहरात फिरणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक केला आहे.
मास्क न वापरणाऱ्याला पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. शनिवारी सलग सहाव्या दिवशी 31 नागरिकांवर कारवाई करून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 15,500 रुपय दंड आकारण्यात आला. 9 प्रभागात आता पर्यंत 448 नागरिकांवर कारवाई करून एकूण 2,24000 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
मास्क ना लावता फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करत असताना मील कॉर्नर येथे नागरी मित्र पथकावर शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या रफत यार खान आणि इतर लोकांवर सिटी चौक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचे सावट असे पर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याच मनपा आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी सांगितले.