औरंगाबाद - महानगर पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच पाच हजार रुपयांचा दंड आकारला. उपजिल्हाधिकारी रवी जगताप यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी आणलेल्या भेट वस्तूला प्लास्टिकचे आवरण असल्याने त्यांना हा दंड लावण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'मराठवाडा विभागीय नियोजन आढावा बैठक' औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित केली होती. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुस्तक मागवले होते. प्लास्टिकचे आवरण असलेले हे पुस्तक घेऊन येणाऱ्या नियोजन उपजिल्हाधिकारी रवी जगताप यांना आस्तिक कुमार पांडेय यांनी पाच हजार रुपयांचा दंड लावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी ही कारवाई केल्याने याची चर्चा रंगली.
हेही वाचा - युवराज आता 'म्हातारीचा बुट' हवाय म्हणून बालहट्ट करतील...
आस्तिक कुमार पांडेय यांनी महानगर पालिकेचा पदभार स्वीकारताच प्लास्टिक विरोधी मोहीम राबवायला सुरुवात केली होती. त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी पालिका उपायुक्तांना, नंतर नगरसेविकेला प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल दंड लावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांचे स्वागत करताना प्लास्टिकचे आवरण असलेले पुष्पगुच्छ देणाऱ्या शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही दंड आकारला होता.