वैजापूर - प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच आपल्या 19 वर्षीय बहिणीची गळा चिरुन अत्यंत क्रूरपणे हत्या ( Aurangabad Honour Killing ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर गळा चिरल्यानंतर बहिणीचे शीर तिच्या सासरच्या मंडळीना दाखविण्याचे राक्षसी कृत्यही या भावाने केले. सैराट चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव शिवारात भावाने सख्या बहिणीची कोयत्याने वार करुन हत्या केली. कारण काय तर प्रेमविवाह का केला? आरोपी अल्पवयीन आहे. तो मुळचा गोयेगाव येथील रहिवाशी आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्यानं रागाच्या भरात कोयत्यानं बहिणीचा गळा चिरुन हत्या केली. मृत मुलीचं नाव किशोरी मोटे असे आहे.
19 वर्षीय किशोरीने सहा महिन्यापूर्वी पळून जाऊन पुण्यातील आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर ते लाडगाव शिवारात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच भाऊ संकेत मोटे यानं लाडगाव गाठलं. त्यानंतर बहिणीला प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला. यावेळी राग अनावर झालेल्या भावाने जवळच असणाऱ्या कोयत्यानं बहिणीवर सपासप वार केले. भावाने इतक्या निर्घुणपणे वार केले की बहिणीचं मुडक शरीरावेगळं झालं होतं. हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवला. शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवलं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या घटेनाचा तपास करत आहे.
मुलीने घरातून पळून जाऊन विवाह केल्याच्या काही दिवसांनंतर आईने मुलीची भेट घेतली. त्यावेळी आईने मुलीचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर काही दिवसानंतर मुलगा आणि आई मोटारसायकलवर मुलीच्या घरी आले. अल्पवयीन मुलानं जॅकेट घातलेलं होतं, मुलगी किचनमध्ये होती. तो थेट किचनमध्ये गेला आणि मुलीवर सपासप वार केले आणि शरीरापेक्षा डोकं वेगळं केलं. डोकं हातात घेऊन बाहेर आला अन् म्हणाला, आम्ही म्हटलं होतं काही दिवसापूर्वी मुलीचा गळा चिरू आज तो चिरला आहे. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलानं आपल्या बहिणीसोबत प्रेम विवाह कऱणाऱ्याकडे धाव घेतली. तोपर्यंत त्या मुलाने पळ काढला होता म्हणून तो वाचला. मुलाची आई शेतात काम करत होती. घटना घडल्यानंतर काही वेळातच गावकरी जमले. पोलिसांना फोन केला आणि पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले.