औरंगाबाद - सिडको भागातील प्रियदर्शनी उद्यानामध्ये सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासह इतर बांधकामाबाबत सुरू असलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असून तोपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती अहुजा यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
वृक्षतोडीबाबत घेतला आहे आक्षेप -
सिडको येथील योगेश साखरे आणि सोमनाथ कराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. प्रियदर्शनी उद्यानात बांधकाम करण्यासाठी झाडे तोडू नये आणि पर्यावरणाला नुकसान पोहचवू नये, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. 2016मध्ये सिडको आणि महानगरपालिकेत झालेल्या कराराद्वारे प्रियदर्शनी उद्यान महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यावेळी सिडकोमध्ये असलेले रस्ते, बाग आदींचा उद्देश बदलू नये, अन्यथा करार रद्द होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. टाऊन प्लॅनिंग विभागाने ही जागा उद्यानासाठी आरक्षित केली होती. या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे आरक्षित जागेचे व्यापारीकरण होऊन कराराचा भंग होत आहे, असे मुद्दे निसर्ग प्रेमींनी याचिकेत मांडले आहेत.
1 हजार 200 झाडे झाली गायब -
2016मध्ये प्रियदर्शनी उद्यानात 9 हजार 885 झाडांची नोंद होती. मनपातर्फे 10 ऑक्टोबर 2019 रोजी खंडपीठात दिलेल्या शपथपत्रानुसार 8 हजार 670 झाडे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे इतर 1 हजार 215 झाडे गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडांना पाणी मिळत नसल्याने, झाडे वाळून जात असल्याचे देखील समोर आले आहे. त्यानुसार याचिका दाखल झाल्यानंतर खंडपीठाने जनसंयोग सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची उद्यानाची पाहणी करण्यासाठी नेमणूक केली होती. त्यांनी पाण्याअभावी उद्यानातील झाडे वाळत असल्याचे, झाडांची चोरी होत असल्याचे निरीक्षण नोंदवले होतं. उद्यानाला संरक्षण भिंती नाही. सुरक्षारक्षक नाही. सिडकोतील पर्यावरण प्रेमींसोबत ही संस्था झाडांना पाणी पुरवठा करत असल्याचे याचिकेत नमूद केले होते.
झाडे तोडणार नाही उद्धव ठाकरेंनी दिले होते आश्वासन -
प्रियदर्शनी उद्यान वाचवा मोहीम राबवण्यात येत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष उद्यानाची पाहणी करून या उद्यानातील एकही झाड तोडणार नाही, असा जाहीर शब्द दिला होता. मात्र, काम सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा शब्द पाळला जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.