औरंगाबाद - शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांची कर्जमाफी देण्याचा निर्णय काल (शनिवारी) राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे.
2014 च्या निवडणुकीत भाजप सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. 2019 च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या नावाने प्रचार केला. मात्र, आता भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला. 2 लाखांच्या कर्जमाफीने शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. राज्यकर्त्यांनी हेक्टरी 25 हजार देण्याच केलेले आश्वासन पूर्ण करावे. या कर्जमाफीच स्वागत करू. मात्र, ही कर्जमाफी शेतकऱ्यांची परिस्थितीत सुधार आणू शकणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे त्यांनी केले नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासानाचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर याचे काही निकष असतील ते देखील तत्काळ स्पष्ट करावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.