औरंगाबाद - योग्य भाव मिळत नसल्यामुळे रागाच्या भरात बोर दहेगाव येथील एका शेतकऱ्याने सुमारे चार क्विंंटल कापूस रस्त्याच्याकडेला फेकून दिला आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा तोटा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मका, कांदा, कापूस, हरबरा, तूर या पिकांचे उत्पन्न घेतले. परंतू कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढला आणि लॉकडाऊनमुळे पिकवलेल्या मालाच्या किमती अचानक कमी झाल्या. मका, कांदा, कापूस, हरबरा, तूर यासारख्या पिकांची खरेदी विक्री थांबली.
बोर दहेगाव येथील शेतकरी रामहरी उगले याने आपल्या शेतात कापसाचे उपन्न घेतले. मात्र, त्याचे उत्पन्न लॉकडाऊनमध्ये अडकले. कापसाला जास्त भाव मिळेल हे स्वप्न त्याचे कोरोनाने धूळीस मिळवले. कापूस खरेदी अचानक थांबल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी वर्गाची मोठी हानी झाली. त्यामुळे रागाच्या भरात उगले याने शेतात पिकवलेले वीस हजार रुपये किंमतीचे पांढरे सोने नवीन समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या बोर दहेगाव पालखेड रस्त्याच्याकडेला फेकून दिले. मोठ्या मेहनतीने पिकवलेले हे सोने क्षणार्धात मातीमोल झाले. सरकारी कापूस खरेदी केंद्र आणि मनमानी पद्धतीने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरुद्ध या शेतकऱ्याने रोष व्यक्त केला आहे.
''आम्ही मोठ्या मेहनतीने आमच्या शेतात वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेत असतो. मी शेतात पिकवलेल्या कापसाची विक्री करण्यासाठी मला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. लॉकडाऊनमुळे कापूस खरेदी पूर्णपणे बंद असल्यामुळे आमचा कापूस व्यापारी पड्या भावाने मागत आहेत. काही सरकारी कापूस खरेदी केंद्रावर शेतकरी सोडून व्यापाऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे कापूस फेकून दिल्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता'', अशी प्रतिक्रिया सचिन उगले या कापूस उत्पादक शेतकऱ्याने दिली आहे.