औरंगाबाद - कन्नड शहाराशेजारील कारखाना परिसरातील एका आठ महिन्याच्या बाळाच्या घशात बिसलरी पाण्याच्या बाटलीचे झाकण अडकले होते. ते झाकण कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना काढण्यात यश आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी दिली. डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश येऊन बाळाचा जीव वाचल्याने पालकांनी आंनद व्यक्त केला असून अब्दुल रहीम अफवान अन्सारी असे या बालकाचे नाव आहे.

शुक्रवारी (ता.28) घरात बिसलेरी बाटलीसोबत खेळताना त्याच्या घशात झाकण अडकले. पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून कन्नड शहरात कान, नाक,घसा तज्ञा डॉक्टर नसल्याने, त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान बालकाला श्वास घेण्यात अडचण येत होती. पालकांना काही सुचत नव्हते, यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार पालकांनी बालकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दवाखान्यात डॉ. प्रवीण पवार यांनी मोठ्या कष्टाने झाकण बालकाच्या घशातून बाहेर काढले. बालकाच्या घशातून झाकण सुखरूप काढल्याने बालकाचा जीव वाचल्यामुळे पालकांनी आनंद व्यक्त केला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले.
