औरंगाबाद - लग्नाला अवघे दोन आठवडे बाकी असताना एका 28 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. औरंगाबाद शहरातील कटकटगेट भागातील टाइम्स कॉलनीत मंगळवारी ही घटना घडली. डॉ. शादाब शिरीन मोहम्मद आरिफ असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा... उत्तर प्रदेश : कार आणि बसच्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार
शिरीन या औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालयात एम.डी. म्हणून कार्यरत होत्या. येत्या 13 मार्च रोजी त्यांचा विवाह होणार होता. घरी लग्नाची तयारी सुरू होती. संपूर्ण परिवारामध्ये शिरीनच्या लग्नाचा उत्साह होता. मात्र, मंगळवारी दुपारी ती अभ्यास खोलीत गेली आणि बराच वेळ झाल्यानंतर देखील बाहेर न आल्याने नातेवाईकांनी तिला आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर विशेष प्रयत्नानंतर दरवाजा उघडला, तेव्हा शिरीनने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. नातेवाईकांनी तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी औरंगाबाद शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर तिथे तिला मृत घोषीत करण्यात आले.
हेही वाचा... भाजपचा एल्गार : शेतकरी, महिला सुरक्षतेबाबत सरकार अपयशी; भाजपचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
लग्नाच्या अवघ्या दोन आठवड्यापूर्वी शिरीनने आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय का घेतला ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.