औरंगाबाद - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत पैठण येथील नाथषष्ठीसह मांगीरबाबा जत्रा आणि उलेमा रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व धार्मिक कार्यक्रमांबाबत त्या-त्या ठिकाणच्या विश्वस्त मंडळांनी सोहळे रद्द करावे, असे आवाहन विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी केले आहे.
कोरोना विषाणूबाबत सतर्कता राहावी यासाठी सरकारने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यानंतर धार्मिक सोहळ्यात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे कोरोना पसरण्याची भीती असल्याने विभागीय आयुक्तांनी बैठक घेतली.
पैठणचा नाथषष्ठी कार्यक्रम रद्द करण्याची विनंती शासनातर्फे करण्यात आली आहे. दरवर्षी होणाऱ्या नाथषष्ठीसाठी 8 ते 10 लाख भाविक पैठण नगरीत दाखल होत असतात. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. विभागीय आयुक्तालयात कोरोना विषाणू आणि धार्मिक यात्रा उत्सवांचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. पैठण येथे १५ दिवस सुरू राहणाऱ्या नाथषष्ठीला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता षष्ठीचा कार्यक्रम रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसात मांगीरबाबाची जत्रा आणि मुस्लीम धर्मियांचा उलेमा सारखे धार्मिक कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे गर्दी होईल असे सर्व रद्द करावे अशी विनंती प्रशासनाने बैठकीनंतर केली आहे. आता आजाराचा धोका लक्षात घेता विश्वस्त मंडळांनी कार्यक्रम रद्द करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे. इतकच नाही, तर प्रशासनाने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्याचे देखील प्रशासनाने स्पष्ट केले.