औरंगाबाद - लष्करी अळीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मक्याचं पीक लावल्यानंतर काही दिवसात लष्करी आळीच्या हल्ल्यामुळे लावलेला मका काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असून दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
औरंगाबादच्या पिसादेवी येथील सुरेश काळे या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी २ एकर शेतात मका लावला होता. मात्र, काही दिवसातच मक्यावर लष्करी अळीने हल्ला केला. यामुळे सर्व मका काढून टाकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
काही दिवसांपूर्वी कृषी विभागाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्या इशाऱ्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच पिसादेवी येथील सुरेश काळे या शेतकऱ्याला दोन एकरात लावलेला मक्याचे पिक काढून टाकावे लागले. जवळपास १० ते १५ हजार रुपये खर्च करून मका लावला. मात्र, काळजी न घेतल्याने मका काढून बाजरीची पेरणी करायची वेळ त्याच्यावर आली आहे. कसेबसे पैसे जमवून बाजरी पेरली. मात्र, पाऊस साथ देईल का? हा प्रश्न सुरेश काळे यांना पडला आहे. कृषी विभागाचा सल्ला न ऐकल्याने अनेक शेतकऱ्यांवर असे संकट आल्याचे दिसून येत आहे.