औरंगाबाद - जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबवण्यात येत असून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध असून तो सुरळीत ठेवण्याची खबरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजन साठा पुरेसा -
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.52% असून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. जिल्ह्याला रोज 60 टन इतकी ऑक्सिजनची गरज असते. सध्या तितका ऑक्सिजन उपलब्ध होत असल्याने तुटवडा नाही. तो सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर करण्यासोबत स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून काही खासगी रुग्णलयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. तसेच घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सिजन साठा वाढविण्यात येत असून अतिरिक्त उपलब्धता सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता, निर्मिती प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत 10 टक्के लसीकरण पूर्ण -
जिल्ह्यात आजपर्यंत पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या 389908 इतकी असून यांचे कोविड लसीकरण झाल्याचे जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ महेश लड्डा यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये 173133 जणांनी पहिला डोस तर 13972 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकूण 187105 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 170925 जणांनी पहिला डोस तर 31878 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकूण 202803 जणांचे लसीकरण झाले आहे. लसींचा साठा नियमित येत असून त्याबाबत नियोजन करून लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रेमडेसिवीरची मागणी वाढली -
जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने गरज असलेल्या गंभीर रुग्णांनाच प्राधान्याने इंजेक्शन द्यावे. सरसकट सर्व कोरोना रुग्णांसाठी त्याचा वापर करु नये. तर आवश्यकता तपासून नंतरच रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांला द्यावे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच त्याचा वापर करण्याबाबत सर्व खासगी डॉक्टरांना निर्देशीत केले असून वापर केलेल्या इंजेक्शन व रुग्णांची माहिती विहित नमुन्यात डॉक्टरांनी प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. तसेच हाफकिनकडे जिल्ह्यासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरची मागणी केली असून लवकरच ते प्राप्त होतील. अनावश्यक रेमडेसिवीरचा वापर केला तर अशा डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात सध्या 349 रुग्णवाहिका असून 192 उपचार सुविधांमध्ये 20572 खाटा उपलब्ध आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन खाटा 2508 तर आयसीयू खाटा 760 आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 1.57 % असून आता व्हेंटिलेटरची उपलब्धताही जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात असून सीएसआर फंडातूनही व्हेंटिलेटर प्राप्त झाले असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.