औरंगाबाद - वाळुज औद्योगिक वसाहतीतील कंपनीत शिरुन, ३१ लाख ६७ हजार रुपयांचे साहित्य चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखा पोलीसांनी वाळुजमधील भारतनगरमधून अटक केली. या टोळीने इंड्युरन्स कंपनीतील सुटे भाग, वायर डिस्क, ब्रेक वायर तसेच इतर साहित्य चोरले होते. त्यावरुन अस्लम बाबू पठाण (३०), शेख अल्लाऊद्दीन उर्फ हारुण शेख सिराज (२०), शेख रशीद शेख हबीब (३४), शेख हारुण शेख हबीब (३८) आणि जुबेर हबीब शेख (१८) यांना पकडले. हे सर्व भारतनगरचे रहिवासी होते.
वाळुज एमआयडीसीतील इंड्युरन्स कंपनीत २३ ते ३१ जुलैच्या दरम्यान पाच जण शिरले होते. या टोळीने गोडाऊनच्या कंपाऊंड वॉलची तार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सुटे भाग, केबल वायर डिस्क, ब्रेक वायर व इतर असा एकूण ३१,६६, ८८३ रुपयांचा ऐवज लांबवला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे मानव विकास अधिकारी संदीप सुरेश जोशी यांच्या तक्रारीवरुन ७ ऑगस्ट रोजी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना खबरीकडून माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांच्यासह पथकातील जमादार सय्यद मुजीब, पोलीस नाईक गजानन मांटे, शिपाई भावसिंग चव्हाण, आनंद वाहुळ, राहुल खरात, नितीन देशमुख आणि अनिल थोरे यांनी सुरुवातीला टोळीचा म्होरक्या असलम पठाण याला पकडले. त्याच्या चौकशीतून आणखी चौघांची नावे समोर आली. यानंतर पोलीसांनी चौघांना पकडत टाटा एस एक्सएसएल (छोटा हत्ती) वाहन (एमएच-२०-ईजी-१७८३) जप्त केले. या वाहनातूनच त्यांनी साहित्य लंपास केल्याचे तपासात समोर आले आहे. या पाचही जणांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी वाळुज पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.