औरंगाबाद - लॉकडाऊन काळात देशी-विदेशी दारूची साठवणूक करून विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या एका कार चालकाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. या कारवाईमध्ये दारूच्या ३८ खोक्यांसह ६ लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खबऱ्याने दिली माहिती -
सध्या राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे दारू विक्रीला देखील बंदी आहे. असे असताना छुप्या पद्धतीने दारुची वाहतूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने उस्मानपुरा भागातील पीर बाजार परिसरात सापळा रचला. एका गाडीमध्ये देशी-विदेशी दारूची खोकी आढळली.
याप्रकरणी पोलिसांनी विनोद प्रेमचंद महतोले (वय 32, रा. पीर बाजार, उस्मानपुरा) याला अटक करण्यात आली आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे रविंद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आचाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.