औरंगाबाद - शहरातील काही शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. तर काही शाळेंच्या परिक्षा सुरू आहेत. सोबतच काही इंग्रजी शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांची तयारी सुरू केली आहे. असेच शैक्षणिक वर्षांची तयारी सुरू असलेल्या टेंडर केअर होम या शाळेत एका खासगी दुकानदाराकडून शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या विरोधात पालकांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पालकांनी याआधी या प्रकाराची शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, शाळा प्रशासनाने गांभीर्य न दाखविल्याने अखेर पालकांनी आज चिकलठाणा पोलीस ठाणे गाठत शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. शाळेत असलेल्या खासगी दुकानदाराकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीची सक्ती करण्यात येत आहे. हे साहित्य बाजारभाव पेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी महाग आहे. त्यामुळे आम्ही याची तक्रार केली असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.
शाळेकडून विद्यार्थ्यांना कोणतेही शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. वह्या-पुस्तकावर छापील नावाचा पालकांना आक्षेप आहे. ज्या विद्यार्थांना ते परत करावे वाटत असेल त्यांचे साहित्य शाळा प्रशासन परत घेण्यास तयार आहे, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पालकांची शाळेविरोधातील तक्रार प्राप्त झाली आहे. चौकशी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळल्यास शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.