औरंगाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात अग्मिशमन दलाला यश आले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत महत्वाची कागदपत्रे जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सिटीसर्व्हे विभागात ही आग लागली होती. कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे कळताच त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनास्थळी महानगर पालिका आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश मिळाले.
आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यावर आगीत नेमके किती नुकसान झाले? हे कळेल.