औरंगाबाद - भाजप शहराध्यक्ष म्हणून संजय केणेकर तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून विजय औताडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. भाजपचे नेते सुजितसिंग ठाकूर यांनी ही घोषणा केली. पहिल्यांदाच खुल्या पद्धतीने जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या. तापडिया नाट्य मंदिरात इच्छुकांशी भाजप समन्वयकांनी चर्चा केली आणि त्यानंतर नावांची घोषणा झाली. मुळात ही नावे एक दिवस आधीच निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. त्यामुळे निवड करताना चर्चांचे नाटक कशाला? असा प्रश्न उपस्थित झाला. इतकेच नाही तर भाजपच्या शहर प्रमुखांच्या आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे देखील बोलले जात आहे.
भाजप पक्षाच्या नियमावलीनुसार दर तीन वर्षांनी 31 डिसेंबरपर्यंत पक्षाच्या नव्या अध्यक्षासह राज्य आणि जिल्हा अध्यक्षांची निवड झाली पाहिजे. मात्र, देशात सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे पदाधिकाऱ्यांच्या निवडीला जानेवारी उजाडला. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी नड्डा यांची निवड झाल्यावर आता राज्यातील सर्वच ठिकाणच्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडी केल्या जात आहेत. त्याअंतर्गत औरंगाबादच्या नवीन शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी घोषणा करण्यात आली.
हेही वाचा - औरंगाबाद शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा राडा, ३ जखमी
भाजप शहराध्यक्ष पदासाठी दिलीप थोरात, प्रशांत देसरडा, राजू शिंदे, संजय केणेकर, शिवाजी डांगे, अनिल मकरिये हे इच्छुक होते तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी लक्ष्मण औटे, विजय औताडे, सुरेश बनकर, अशोक पवार, किशोर धनायत, संजय खांबायते हे इच्छुक होते. तापडिया नाट्यगृहात रंगलेल्या सोहळ्यात भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांनी सर्वांसमक्ष इच्छुकांशी चर्चा केली. त्यानंतर नव्या अध्यक्षांची निवड जाहीर केली. निवड केलेल्या शहराध्यक्ष संजय केणेकर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांची निवड एक दिवस आधीच निश्चित मानली जात होती. त्यामुळे अध्यक्ष निवडीचा सोहळा कशासाठी? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला. मात्र, पक्षाची शिस्त म्हणून कोणीही जाहीरपणे विरोध केला नाही, असे मत अनौपचारिकपणे भाजप कार्यकर्त्यांनी 'ईटीव्ही भारत'कडे व्यक्त केली.
हेही वाचा - कन्नडमधील भगवान गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण