औरंगाबाद : 'संघ परिवाराचा मागील 40-50 वर्षांपासून अजेंडा राहिला आहे. आता ते भाजपच्या माध्यमातून समान नागरी कायद्याबाबत भूमिका घेत आहेत. मुस्लिमांना निशाणा केल्याने इतर धर्मियांचे देखील नुकसान होणार असल्याने सर्वांनी मिळून या कायद्याला विरोध करा', असे आवाहन एमआयएम पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.
'आंबेडकरांपेक्षा मोठा कायदे तज्ञ नाही' : ओवैसी म्हणाले की, 'या आधी महात्मा गांधी आणि नेहरू यांनी मुस्लिम लॉ मधे बदल होणार नाही असे सांगितले. त्यानंतर पाठक नावाच्या कायदे तज्ञांनी लोकसभेत पर्सनल लॉ बाबत बोलताना कोणावरही दबाव टाकून तो सोडण्यास भाग पाडू शकत नाही, असे म्हटले. देशात आजही असे भाग आहेत जिथे देशाचा कायदा मानला जात नाही. हिमाचल मधे जाण्यासाठी परवानगी लागते. पंतप्रधानांना हे माहीत आहे की नाही? तुम्हाला मुस्लिम पर्सनल लॉ मान्य नसेल तर चालेल. मात्र आम्हाला कुराणमध्ये आयुष्य जगण्याचे अधिकार दिले आहेत. कायदे तयार करताना आंबेडकर आणि इतर सदस्यांनी त्यावेळी त्याबाबत जास्त विचार केला नाही. आज मुस्लिम पर्सनल लॉ कायद्याचा भाग आहे. आंबेडकर यांच्यापेक्षा मोठा कायदे तज्ञ कोणीही नाही', असे मत खासदार ओवैसी यांनी व्यक्त केले.
'सर्वाधिक नुकसान हिंदूंचे होणार' : ओवैसी पुढे म्हणाले की, फक्त भारतात वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे आहेत. इतर देशांमध्ये सर्वांसाठी एकच कायदा असतो, असे भाजपवाले म्हणतात. मात्र इंग्लंड, श्रीलंका, इस्राईल, सिंगापूर मधे पर्सनल लॉ आहे. समान नागरी कायद्याने सर्वाधिक नुकसान हिंदूंचे होणार आहे. हिंदू मॅरेज ॲक्ट मधे लग्नाबाबत सूट दिली आहे. या कायद्यामुळे मुसलमानांपेक्षा इतर समाजाचे नुकसान अधिक होणार आहे, अशी भीती खासदार ओवैसी यांनी व्यक्त केली.
'सर्वांचेच नुकसान होईल' : ओवैसी पुढे बोलताना म्हणाले की, शीख धर्मगुरूंनी समान नागरी कायदा मान्य करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ख्रिश्चनांना देखील त्रास होणार आहे. मेघालयात लहान मुलीला मालमत्ता दिली जाते. झारखंडमध्ये आदिवासी जमीनीबाबत कायदा आहे. मोदी मुस्लिमांचे नुकसान करण्याचा विचार करत आहे, मात्र नुकसान सर्वांचेच होणार आहे, असा घणाघात ओवैसींनी केला.
'मुसलमानांना टार्गेट केले जात आहे' : यावेळी बोलताना औवेसी यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला. ओवैसी म्हणाले की, 'सर्वात आधी महिलांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मुस्लिम समाजाने दिला. मुस्लिम आणि हिंदू यांच्या दुसऱ्या लग्नात फार थोडा फरक आहे. मुस्लिम समाजात देखील काही ठिकाणी अडचणी आहेत, मात्र त्या सर्व समाजातच आहेत. मुस्लिम धर्मियांत मुलींची आणि मुलांची संख्या समान आहे', असे ते म्हणाले. ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीसांनाही इशारा दिला. आदिवासी भागात जाऊन समान नागरी कायद्याबाबत बोलून दाखवा, असे ते म्हणाले.
हेही वाचा :