औरंगाबाद - आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. राज्यात रिपब्लिकन सेनेची पुन्हा उभारणी करणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी औरंगाबादेत दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमासाठी ते औरंगाबादला आले होते.
घर तेथे रिपब्लिकन सेना, असे धोरण असून सेना गतिमान करणार आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या गटातटाचे लोक येण्यास तयार असून वेगळी ताकद निर्माण करून समाज उभारणीचे काम करणार असल्याचेही आनंदराज आंबेडकरांनी सांगितले.
हेही वाचा - मला माझ्या पतीसोबत बोलू द्या, पत्नीचे सासुरवाडीत आंदोलन
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. वंचितमधील ओबीसी नेते हे नेते आहेत का? हे तपासण्याची गरज आहे. ओबीसी नेत्यांसोबत ओबीसीची मते वंचितला मिळाली का? असा प्रश्न उपस्थित करत वंचितमधून बाहेर पडल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये जाहीर केले. यापुढे राज्यामध्ये रिपब्लिकन सेना वाढणार असून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन संघटनेची नव्याने बांधणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकरी विचारावर आधारित संघटनेची ओळख होईल. रिपब्लिकन सेनेची वेगळी ओळख आहे. मात्र, आंबेडकरी चळवळीला मजबूत करण्यासाठी पाठिंबा दिला. मात्र, अपेक्षेप्रमाणे काम झाले नाही.
सर्व समाज सैरावैरा पळू लागला आहे. त्याला एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळेच रिपब्लिकन पक्ष नव्याने उभारणी करत असल्याचे आनंदराज आंबेडकरांनी सांगितले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार रिपब्लिकन सेना देणार असून तशी चाचपणी सुरू केल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ; 26 वा नामविस्तार दिन उत्साहात