औरंगाबाद - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारकीची निवडणूक 19 ऑगस्टला पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव आता पुढे आले आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
अंबादास दानवे गेल्या अठरा वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आमदारकीच्या रेसमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना डावलून अंबादास दानवे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य मतदान करणार आहेत. 19 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. शिवसेनेकडून राज्याचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह औरंगाबाद शहरातील राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणाच्या न्यायहक्कासाठी न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांना देखील उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मातोश्रीवर बैठकीत जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचे निश्चित झाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून यावेळेस अंबादास दानवे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.
याआधी शिवसेनेकडून किशनचंद तनवाणी यांनी सहा वर्षे आमदारकी भूषवली होती. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनी किशनचंद तनवाणी यांचा पराभव करत आमदारकी मिळवली होती. पक्षीय बलाबल पाहता शिवसेना-भाजपचे पारडे जड मानले जात असले तरी, अपक्ष उमेदवारांचे मत हे निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेला युतीच्या सदस्यांसोबत अपक्ष सदस्यांची मतेदेखील मिळवण्याचे आव्हान असणार आहे.