औरंगाबाद- येथील हातमाळी मधील आकाश खिल्लारेला 'राष्ट्रपती बालशौर्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे त्याच्या गावात उत्साह पाहायला मिळत आहे. या पुरस्कारामुळे छोटेसे असलेले हातमाळी गाव दिल्लीला देखील माहित झाले, अशी भावना गावकऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा- लोकशाही निर्देशांकाच्या क्रमवारीनुसार भारतात 'सदोष लोकशाही'
22 जानेवारी 2018ला हातमाळी गावातून जाणाऱ्या दुधना नदीत बुडणाऱ्या रेणुका आणि श्रद्धा मस्के या मायलेकींना आकाशने जीवाची पर्वा न करता वाचवले होते. त्याच्या या शौर्यासाठी यावर्षीचा राष्ट्रपती बालशौर्य पुरस्कार त्याला देण्यात आला. त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. औरंगाबादपासून जवळपास 45 किलोमीटर हातमाळी गाव आहे. गावाची लोकसंख्या अवघी दोन ते अडीच हजार आहे. जिल्ह्यात अनेकांना तर या गावाचा परिचय देखील नाही.
22 जानेवारी 2018 या दिवशी शाळेत जात असताना आकाशने नदी पात्रातून वाचवा.. वाचवा.. असा आवाज ऐकला. लहान मुलगी आणि आई पाण्यात बुडत असल्याच त्याने पाहिले. कुठलाही विचार न करता त्याने नदीत उडी मारली आणि रेणुका आणि श्रद्धा मस्के या मायलेकींचा जीव वाचवला. ही घटना घडल्यावर जवळपास चार दिवस कोणालाही याची माहिती नव्हती. दरम्यान, एका चौकात या घटनेची चर्चा सुरू असताना बाजूच्या गावातील जितेंद्र डेरे या पत्रकाराला याची माहिती मिळाली. त्यानंतर पाच दिवसांनी आकाशचे शौर्य जगाला कळाले. दोन वर्षांनी त्याच्या शौर्याचा सन्मान केला गेला.
गावात पुरस्कार मिळाल्याची बातमी कळताच गावात आनंद व्यक्त केला गेला. गावाचे नाव आकाशने अवघ्या देशाला माहिती करून दिले. त्याचा अभिमान वाटतो, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. खेळात अभ्यासात हुशार असलेला आकाश स्वभावाने चांगला आहे. त्याने केलेल्या शौर्याच्या कामामुळे एक कुटुंब वाचले आहे. आकाशची प्रगती अशीच व्हावी, अशी मनोकामना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
त्याचे उपकार मी विसरणार नाही-
'आकाशने माझ्यासाठी सैराटच्या परश्यासारखी उडी मारली. तो देव असून त्याचे उपकार कधीही मी विसरणार नाही. त्याच्या शौर्याने त्याला हा पुरस्कार मिळाला', अशी भावना रेणुका मस्के यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.