छत्रपती संभाजीनगर : 50 खोके घोषणा दिल्यावर शिंदेंच्या गटातील सगळ्यांना खूप राग यायचा. अनेकांनी आम्हाला खासगीत बोलून दाखवले. आता काल नांदेडमध्ये भाजपचे एक पोस्टर होते, त्यात 50 खोके, 105 डोके असे पोस्टर लावले होते. यातून भाजपने शिंदे शिवसेनेला डिवचले असे मला वाटते अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. शिंदे गट, आता भाजप शिंदे गटाच्या आमदारांना 50 खोके म्हणत असतील तर, आम्ही करत असलेल्या आरोपाला दुजोरा मिळाला अशी, टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ : भाजप सत्तेवर असणारा पक्ष आहे. ते त्यांच्या पद्धतीने यंत्रणा राबवणार. ते त्यांच्या पद्धतीने काम करतील त्यावर आम्ही काय बोलणार असे, अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही 3 पक्ष मिळून पुढे जायचे ठरवले आहे. जिंकलेल्या जागा बाजूला ठेवून 25 जागांची पहिली चर्चा करू. मग ज्याने त्याने जिंकलेल्या 23 जागांची चर्चा करू. तीन पक्ष एकत्र आहेत. आपले जे मित्र पक्ष आहेत (संभाजी ब्रिगेड, वंचित आघाडी) त्यांना प्रत्येक पक्षाने आपापल्या कोट्यातून जागा द्याव्यात, हे माझे मत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
माझे काही चुकले नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत स्तुती केल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना स्वतंत्र्य मिळाल्यापासून काही लोकांचा करिश्मा आपण पहिला आहे. नागरिकांनी इंदिरा गांधींना सत्तेवर बसवले. आणीबाणी लावल्यानंतर त्यांना जनतेने बाजूला केले. नंतर परत त्या सत्तेत आल्या. त्यांचा करिश्मा होता म्हणून, अशी अनेक नेत्यांची नावे घेता येतील. भाजप सत्तेवर आलेला पक्ष म्हणून नाही तर मोदींचा करिश्मा चालला म्हणून, हे माझे मत आहे. यात माझे काय चुकले असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
राज्यात सरकारची जाहिरातबाजी सुरू : मधल्या काळात, शिंदे, भाजप सरकार आले. आम्हाला नाव ठेवून त्यांनी तसा निर्णय घेतला. मात्र, त्यांची जाहिरातबाजी सुरू आहे. त्यावर आम्ही भूमिका मांडली, यांनी पुन्हा जाहिरात बदलली. त्यानंतर काय तर कुणी जय वीरू, कुणी फेवीकॉल. कसली जोडी करायची करा असा खोचक टोला पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे.
'जनता परेशान' : आम्ही शेतकरी आहोत आमच्याही जोड्या होत्या. पण त्या राजा, सर्जाच्या जोड्या होत्या. मी काही त्यांच्यासोबत बरोबरी करत नाही. मात्र, असे सांगायची वेळ तुमच्यावर का येते? कोट्यवधींच्या जाहिराती तुम्ही देता, त्यात बाळासाहेबांचा फोटो नाही, दिघेंचा फोटो नाही, म्हणे दिघे आमच्या हृदयात आहेत. मग दुसऱ्या दिवशी हृदयातून पेपरमध्ये कसे आले, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. जनता परेशान आहे, सरकारला त्याचे काही घेणं देणं नाही. अजून पाऊस नाही, कोकणात सुद्धा टँकर सुरु आहे असे अजित पवार म्हणाले.
राज्यकारभारकडे लक्ष द्या : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर रिक्षा चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न, आताच बातमी आली, सारख्या अशा घटना घडता आहेत. राजकारण्यांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्याला हवा. समाजात विकृती वाढत चालली आहे, महिलांवर अत्याचार होता आहेत. जातीय दंगली होता आहेत. तरुण आता राज्यात आत्महत्या करत असेल तर एकमेकावर टीका राज्यकारभारकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी शिंदे सरकारला दिला आहे. सरकार नक्की कशासाठी आले आहे, फेविकॉल जोड म्हणतात मात्र, कार्यकर्ते परेशान आहे. पिंपरीला शासन आपल्या दारी कार्यक्रम केला महिलांना वेगळे काहीतरी सांगून आणले, त्यामुले गोंधळ झाला, अशी टीका अजित पवार यांनी केली.
राज्यातील मंत्र्यांवर आरोप : राज्यातील मंत्र्यांवर आरोप होत आहेत, एकटे अब्दुल सत्तार नाही 5 ते 6 मंत्र्यांचे प्रकरण पुढे येत आहे, सरकारने याबाबत मत व्यक्त करावे. मात्र, तसे दिसत नाही, काही ठिकाणी टाकलेल्या धाडी कायदेशीर की बेकायदा हा संशोधानाचा भाग आहे. त्यांचा पीए आहे की नाही हे सुद्धा शोधावे लावेल. गृहमंत्र्यालायचे प्रमुख कमी पडत असतील तर, त्यांचा राजीनामा मागण्याचे अधिकार आहे. ही राष्ट्रवादीची मागणी आहे.
दीपक केसरकर यांना संबंध आठवले : दीपक केसरकर यांनी मला ऑफर दिली. त्यांना एकेकाळी आमदारकीचे तिकीट मी द्यायला सांगितले होते, ते नगर अध्यक्ष होते. पुढे मोठे राजकारण झाले. स्थानिक खटके उडाले, केसरकर मला म्हणाले दादा आता मला कामच करता येत नाही. म्हणूम नाउमेद होऊन ते शिवसेनेत गेले. त्यांना पूर्वाश्रमीचे माझे, त्यांचे मैत्रीचे संबंध आठवले असतील म्हणुन केसरकरांनी मला ऑफर दिली असेल अशी मिश्किल टीका अजित पवार यांनी केली.
नवाब मलिक यांना जामीन द्या : 21 तारखेला मुंबईला आम्ही राष्ट्रवादी पक्षाची सभा घेतो आहे. सगळे महत्वाचे नेते येतील, विधानसभा लोकसभा निवडणूक अवकाश असला तरी तयारी करावी लागेल. नवाब मलिक यांची तब्येत ढासळली आहे. आम्ही कोर्टात त्यांची बाजू मांडतो आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा येतील, ते देश सोडून पळून जाणार नाही. कुणावर अन्याय होऊ नये ही आमची माफक अपेक्षा आहे असे अजित पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.