औरंगाबाद - जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ अजिंठा-वेरूळ येथील दोन पर्यटन माहिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाच कोटी रुपयांचे वीजबील आणि पाणीबील थकल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. महाराष्ट्र सरकार आणि जपानच्या आंतरराष्ट्रीय सहाय्यता संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांतून ही दोन केंद्रांची उभारणी करण्यात आली होती.
अजिंठा-वेरूळला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. वर्षभरात जगभरातून लाखो पर्यटक या लेणींना भेट देण्यासाठी येतात. येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी 2013 मध्ये 125 कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी दोन माहिती केंद्रे उभारली होती. मात्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)च्या दुर्लक्षामुळे सप्टेंबर महिन्यापासून ही माहिती केंद्रे बंद पडली आहेत.
या केंद्रांच्या देखभालीसाठी खुप मोठी रक्कम जपानकडून देण्यात येते. काही रक्कम राज्य सरकार खर्च करते. सप्टेंबर महिन्यापासून वीजबील आणि पाणीबील न भरल्यामुळे ही माहिती केंद्रे बंद करण्यात आली. आत्तापर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्य सरकारकडे ही बीले भरण्यासाठी पाच ते सहा वेळा निधीची मागणी केली आहे. सरकारकडून 5 कोटी रुपये मिळालेही होते मात्र, ते मागील बीले भरण्यातच गेले. अजूनही एमटीडीसीला 10 कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी माहिती एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.