वैजापूर (औरंगाबाद) - शिऊर परिसरातील बागायदार वस्ती, किटे वस्ती, जाधव वस्ती, तुपे वस्ती, वरपे वस्ती व सावखेड खंडाळा रस्ता येथील रहिवासी असून शिऊर ते सावखेड (खं) या तीन किमी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्याने दळणवळण करणे कसरतीचे ठरत आहे, या रस्त्याचे काम मार्गी लावावे या बाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून दखल घेतली जात नाही यामुळे उद्विग्न झालेल्या येथील ग्रामस्थांनी अखेर आक्रमक पवित्रा घेत १७ सप्टेबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी याच रस्त्यावर असलेल्या पाण्यात येथील नागरिकांनी 'अर्धनग्न जलआंदोलन' करण्यात आले होते. अखेर बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर जलआंदोलन मागे घेण्यात आले.
रस्त्यावर पूर्ण पानी व चिखलाचे साम्राज्य -
शिऊर हे वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव असून या गावाला दैनंदिन संपर्क असतो. यात आठवडी बाजार, पोलीस ठाणे, बँक, शाळा-महाविद्यालये, आरोग्यासह विविध सुविधा शिऊरला असल्याने परिसरातील खेड्यातील नागरिकांची कायमच वर्दळ असते. दळणवळणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या रस्त्यांची मात्र चाळणी झाल्याने विद्यार्थी, रुग्ण, अपंग यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिऊर ते बागायतदार वस्ती मार्गे जाणाऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत असून या रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यात यावे, यासाठी कित्येकदा अर्ज, विनंती, निवेदन देण्यात आले. कायम या मागणीला केराची टोपलीच दाखविल्याने या रस्त्याची स्थिती जैसे थे राहिली. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या रस्त्यावर पूर्ण पानी व चिखलाचे साम्राज्य आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद असून मोठ्या अडचणीतून मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेकडे आठ दिवसात प्रस्ताव देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
महसूल विभागाचे कोणीही नाही
या अर्धनग्न आंदोलनाबाबत वैजापूर येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. तहसीलदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी येणे अपेक्षित व आवश्यक होते. बांधकाम विभागासह पोलीस कर्मचारी आंदोलन स्थळी उपस्थित होते. मात्र, महसूल विभागाचे एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. नागरिकांच्या मुलभूत गरजाच्या मागणीसाठी तहसील विभाग किती अनभिज्ञ आहे, हे यावरून दिसून आले. दरम्यान, यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे अभियंता केटी हत्ते, आय.एन शेख, पोलीस ठाण्याचे अविनाश भास्कर, किरण रावते, आर. आर जाधव, के.पी पवार, यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
आंदोलनात यांची होती उपस्थिती -
या अर्धनग्न जलआंदोलनात संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळा जाधव, अनिल भोसले, अकबर शेख, सुनील खांडगौरे, विजय झिंजुर्डे, कृष्णा जाधव, बाळू पवार, पोपट जाधव, विश्वनाथ जाधव, अंकुश वरपे, देविदास किटे, दादासाहेब औटे, गोकुळ किटे, वाल्मिक किटे, दीपक जाधव, रामेश्वर जाधव, बाळू धनेश्वर, दादासाहेब जाधव, संतोष जाधव, रतन आगवान, मोतीराम आगवान, नवनाथ जाधव, महेश वरपे, भास्कर आगवान, शुभम देशमुख, बाबासाहेब पगार आदीसह येथील रहिवासी सहभागी झाले होते.
हेही वाचा - IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय