औरंगाबाद - जिल्ह्यातील पैठणच्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे धरणावरील आणि परिसरातील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी तामिळनाडुत घुसल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतर, देशातील सर्वच महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात आणि जायकवाडी लाभ क्षेत्रात पाऊस झाला नसला तरी, नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण ९२ टक्के भरले होते. त्यांनतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत अलर्ट जारी केल्याने आता पर्यटकांना धरणाजवळ जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. धरण परिसरात खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे हा सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पूर्वी चार पोलीस कर्मचारी धरणावर नेमण्यात आले होते. मात्र, आता येथे १२ सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलसंपदा विभागानेही खाजगी सुरक्षा रक्षक वाढवले आहेत. तर याबरोबरच सर्व बाजूच्या चौक्यांवर २४ तासाचा खडा पहारा ठेवणार असल्याची माहिती धरणावर नियुक्ती असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी तामिळनाडुत घुसल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतर, देशातील सर्वच महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याआधी सुद्धा जायकवाडी धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एटीसकडून जलसंपदा विभागाला पत्र देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.