औरंगाबाद : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा श्रीकांत शिंदे या दोन युवराजांच्या आज सभा होणार आहेत. एकाच तालुक्यात वेगवेगळ्या वेळेला होणाऱ्या या सभा होणार असल्याने दोघे आपल्या भाषणात काय बोलणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना लागली आहे. युवासेना प्रमुख आ आदित्य ठाकरे सिल्लोड येथे सभा घेणार अशी घोषणा करण्यात आली. लगेच शिंदे गटातर्फे खा श्रीकांत शिंदे यांच्या सभेची घोषणा करण्यात आली.
पोलिसांनी आधी आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली गेली होती. तर शिंदे यांच्या सभेला परवानगी दिल्याने राजकीय वाद निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी खुलासा करत गर्दीच्या ठिकाणी सभा असल्याने परवानगी नाकारली असली तरी जागा बदलून सभा होऊ शकते अस सांगितले. त्यांनतर आता दोघांच्या एकाच दिवशी सभा होणार असल्याने सिल्लोड सोमवारचा दिवस राजकीय आखाडा रंगणार आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्या नंतर बालेकिल्ल्यात पक्ष बांधून ठेवत मतदार टिकवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. जिल्ह्यातील पाच आमदार फुटल्याने आता नव्या जोमाने पक्ष बांधणी सुरू करण्यात आली. उध्दव ठाकरे यांनी नुकताच अतिवृष्टी पाहणी दौरा केला होता. तर आता युवराज बंडखोर आ संदीपान भुमरे आणि आ अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात जाहीर सभा घेणार आहेत. या सभा यशस्वी करण्यासाठी उध्दव ठाकरे यांची शिवसेना तर त्यांना गर्दी होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रयत्न करणार असल्याने सर्वांचे लक्ष राजकीय ड्राम्याकडे लागले आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी सिल्लोड येथील जिल्हा परिषद मैदानाची परवानगी शिंदे गटाकडून मागितली गेली होती. तर आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी सिल्लोड येथील महावीर चौकात सभची परवानगी मागितली होती. मात्र दोन्ही सभा स्थळ जवळ-जवळ होत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी दोघांना सुरवातीला परवानगी दिली नव्हती तर्र आदित्य ठाकरे यांना सभास्थळ बदलून पर्यायी जागा देण्याबाबत पोलिसांनी सुचवले.
शिवसेना पक्षात बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार घेत आपला वेगळा गट स्थापन केला. आता ते भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, या सरकारला विरोधी पक्षांकडून खासकरून ठाकरे गटाकडून वारंवार गद्दार म्हणून टीका केली जात आहे. यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी रान उठवत, राज्यभरात निष्ठा यात्रा काढली होती या निष्ठा यात्रेला शिवसैनिकांचा चांगला पाठिंबा मिळाला होता.