औरंगाबाद - भरधाव ट्रक मधील अॅसिडचा ड्रम खाली पडून लिकेज झाल्याने एक किलोमीटरपर्यंत अॅसिडचा उग्र वास पसरला. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या अनेक वाहनचालकांना चक्कर आणि मळमळीचा त्रास झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, या रस्त्यावरील वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवली. ही घटना पैठण लिंक रस्त्याकडून बीड बायपासकडे जाणाऱ्या मार्गावर घडली.
पैठण लिंक रस्त्याकडून बीड बायपासकडे एक ट्रक रविवारी दुपारी अॅसिड घेऊन जात होता. हा ट्रक महानुभाव आश्रम पोलीस चौकीजवळ असताना अॅसिडचा एक ड्रम खाली पडून फुटल्याने त्यातील ऍसिड रस्त्यावर वाहू लागले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांने ट्रक उभा केला. अॅसिडच्या वासामुळे चालकास चक्कर येऊ लागली आणि मळमळ होत असल्याने तो तिथून लगेच निघून गेला. शिवाय त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या अन्य वाहन चालकांनाही अॅसिडच्या उग्र वासाचा त्रास होऊ लागला.
या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक लिंक रस्त्याकडे वळवली तसेच बायपासकडून लिंक रोडकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.