औरंगाबाद - अडीच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ करून तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पती व सासरच्या मंडळीसह गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांविरूद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे नाव सोनाली किशोर भुजबळ(२०) असे आहे. तर, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पती किशोर सोपान भुजबळ, सासू लीला सोपान भुजबळ, सासरा सोपान विठ्ठल भुजबळ यांच्यासह डॉ. मोरे आणि डॉ. सरोज राठी यांचा समावेश आहे. दरम्यान, डॉ. सरोज राठी यांनी अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव घेतली असून, यावर ६ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
सोनालीचे ३० डिसेंबर २०१८ ला किशोर भुजबळ याच्याशी लग्न झाले होते. विवाहाच्या महिनाभरानंतर माहेरहून अडीच लाख रुपये आणावेत म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी सोनालीचा छळ सुरू केला. सोनालीच्या वडिलांनी ५० हजार रुपये दिले मात्र, त्यानंतरही तिचा छळ सुरूच होता. दरम्यान ती गर्भवती राहिली. सासरच्यांनी सुरुवातीला एमआयडीसी वाळूज येथील डॉ.राहुल इंदे यांच्याकडे तिला तपासणीसाठी नेले. तेथे ६ आठवड्यांचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले आणि २ आठवड्यांनी पुढील तपासणीसाठी बोलावले. परंतु सासरच्या लोकांनी सोनालीला पुन्हा डॉ. इंदे यांच्याकडे न नेता डॉ. मोरे यांच्याकडे नेले. डॉ. मोरेनी तिच्यावर अघोरी उपचार केल्यामुळे सोनालीच्या पोटात दुखू लागले. प्रचंड वेदना सुरू झाल्यावर डॉ. मोरे यांच्यामार्फत तिला सरोज हॉस्पिटलमध्ये डॉ. सरोज राठी यांच्याकडे नेण्यात आले. तेव्हा मे महिन्याचा शेवटा आठवडा सुरू होता. त्यानंतर तेथे सोनालीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचे सोनालीने फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा - समाजवादी पक्षाचा 'खंडणीखोर' नेता औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात
काही दिवसांनंतर तिला वेदना होऊ लागल्याने वडिलांनी तिला वाळूजमध्ये खासगी रुग्णालयात नेले. तेथे गर्भपात केल्याने हा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. आपला गर्भपात झाल्याचे कळताच सोनालीने पोलिसात धाव घेतली; परंतु क्रांती चौक पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे सोनालीने अॅड. दिलीप खंडागळे यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पती व सासरच्या मंडळींसह डॉ. मोरे आणि डॉ.सरोज राठीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार क्रांतीचौक पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक गजानन सोनटक्के करत आहेत.
हेही वाचा - गरम पाण्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू