औरंगाबाद - नारेगाव परिसरात मंगल कार्यालयाच्या मालकावर विवाह सोहळ्यात गर्दी जमवल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतानाही विवाह आयोजित करुन कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिकांनी पोलिसांना दिली माहिती
कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत लॉकडाऊन लावले आहे. यामुळे जिल्ह्यात लग्न समारंभास बंदी घालण्यात आली आहे. मात्र नारेगाव येथे गर्दी जमवून विवाह सोहळा सुरू होता. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. गोल्डन लॉन्सवर मोठ्या प्रमाणात लोक जमले असून लग्न सुरू असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ८० पेक्षा अधिक नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा सुरू होता.
आयोजक व लॉन्सचालकावर गुन्हा दाखल
जिल्ह्यात अंशात लॉकडाऊन असताना विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालयात उपलब्ध करून दिले. शिवाय गर्दी जमल्यामुळे पोलिसांनी तत्काळ लग्नाचे मुख्य आयोजक व लॉन्स मालकावर कारवाई केली. या कारवाईत फहीम शेख सलीम, जफार खान गफार खान, फिरोज खान मोहम्मद खान, इम्रान अन्सार पठाण, शहनाज शेख हरुण, शेख हरुण शेख बशीर, अन्सार पठाण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-चोपडा येथे पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचे अधीक्षकांचे स्पष्टीकरण