औरंगाबाद - नाशिकहून गंगासागरकडे जाणारी भाविकांची बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. सिल्लोड तालुक्यातील पालोद गावाजवळ काल(3 जानेवरी) रात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. दामोदर लक्ष्मण खैरनार, असे मृताचे नाव आहे.
नाशिक जिल्ह्यातील जवळपास 41 भाविक 1 जानेवारीला जगन्नाथपुरी-गंगासागर दर्शन यात्रेसाठी खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने निघाले होते. पालोद गावाजवळ येताच एका वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि बस पलटी झाली. या अपघातात जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना औरंगाबाद येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर, इतर जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा - धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस चढली बांधावर, 23 जखमी
या घटनेतील मृत दामोदर लक्ष्मण खैरनार हे मुंबई येथील रहिवासी होते. ते मुंबई मनपाचे सेवानिवृत्त अभियंता होते. दरम्यान, अपघात होताच बसचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. कैलास चव्हाण, असे बस चालकाचे नाव आहे. तो औरंगाबादच्या गल्ले बोरगाब येथील रहिवासी आहे. घटनेनंतर बस कंपनी मालकाने दुसऱ्या बसची व्यवस्था केली होती. मात्र, भाविकांनी पुढील यात्रा रद्द करत परतण्याचा निर्णय घेतला.