औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दीड महिन्यात कोरोनाचे 6 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांसह लोक प्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी 10 ते 18 जुलै असा नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
आज सकाळपासून शहरातील मुख्य मार्गांवर शुकशुकाट दिसून आला. मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये किराणा दुकान, औषधांची दुकाने व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आता सुरू केलेल्या नऊ दिवसांच्या जनता कर्फ्यूमध्ये निवडक औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बाजार पेठेतील सर्व दुकान बंद असल्याचे पहायला मिळाले. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येणार असल्याने रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. कारमध्येही चालक आणि एक व्यक्ती अशा दोघांनाच अत्यावश्यक काम असेल तर परवानगी देण्यात आली आहे. बाहेर गावाहून शहरात येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. या बंदसाठी पोलिसांनी पूर्ण क्षमतेने आपले कर्मचारी रस्त्यावर उतरवले आहेत. छोट्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विशेष गस्त ठेवण्यात आली असून कोणीही घराबाहेर येणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. पुढील नऊ दिवस नागरिकांनी असाच प्रतिसाद दिला तर कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
नियम-अटींसह काही उद्योग सुरू -
वाळूंज परिसरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता येथील उद्योगही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही उद्योग बंद ठेवल्यास मोठे नुकसान होऊ शकते किंवा काही उद्योग सुरू ठेवणे अत्यावश्यक असल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अटी-शर्ती लावून निवडक उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.