औरंगाबाद - शहरातील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी 50 ते 60 हजाराची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना वाळूज एमयडीसी भागात घडली आहे. मात्र, चोरटे मंदिराच्या कॅमेरात दानपेटी फोडताना कैद झाले आहेत.
शहरातील वाळूज औद्योगिक क्षेत्रातील टर्मिनल परिसरात हनुमान मंदिर आहे. या मंदिरात असलेल्या दानपेटीवर आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिरात दोन चोरट्यांनी प्रवेश केला. यातील एकाने दानपेटी फोडली तर त्याचवेळी दुसरा बाहेर रेकी करीत होता. नंतर चोरट्यांनी दानपेटीतील सर्व रोकड रुमालात बांधून पोबारा केला.
मात्र, ही घटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सकाळी मंदिरात भाविक दर्शनासाठी आल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. दानपेटीत सुमारे 50 ते 60 हजार रुपयांची रोकड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी, वाळूज एमयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.