औरंगाबाद - बिहार निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला पाच जागांवर विजय मिळाला. या विजयानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या यशाबद्दल बिहारच्या जनतेचे आभार मानले. आमच्यावर विविध आरोप केले जात होते मात्र निवडणुकीत सर्वात चांगला स्ट्राईक रेट हा आमच्या पक्षाचा राहिला, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
बिहार विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमला पाच जागांवर विजय मिळाला. दिवसभरात मतमोजणी जसजशी होत गेली, तसतसे एमआयएमच्या विजयावर शिक्कामोर्तब होत गेले. कमी जागांवर निवडणूक लढवत चांगलं यश मिळाल्यानंतर औरंगाबादेत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. खासदार जलील यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जलील घराबाहेर पडताच, जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. खासदार जलील आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असोउद्दीन ओवेसी यांच्या जोरदार प्रचारामुळे हा विजय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
बिहार निवडणुकीच्या प्रचारात आमच्यावर विविध आरोप केले गेले. विशेषत: काँग्रेसकडून आमच्यावर आरोप करण्यात आले. आम्ही जिंकण्यासाठी नाही तर भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक लढवतो, असा आरोप करण्यात आला. त्यावेळेस आम्ही मतदारांना शांत रहा आणि मतदान करताना योग्य उत्तर द्या असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्हाला मोठे यश बिहारच्या जनतेने दिले. या यशाबद्दल बिहारच्या जनतेचे आभार मानतो. या निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट हा सर्वात चांगला राहिला अशी भावना यावेळी इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.