औरंगाबाद - महानगर पालिकेच्या कोविड सेंटरमधून 48 रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्वाचे असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून सर्वत्र गोंधळ निर्माण झाला असतानाच औरंगाबाद महानगरपालिकेच्या मेडिकल स्टोअर रुममधून इंजेक्शनचा अख्खा बॉक्सच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि. 28 एप्रिल) उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सरकारी कोट्यातून आले होते इंजेक्शन
औरंगाबाद महानगरपालिकेने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारी कोट्यातून दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी केली होती. त्यामध्ये काही इंजेक्शन घाटी रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाला पुरवण्यात आले. तर उर्वरित रेमडेसिवीर इंजेक्शनपैकी साडेचार हजार इंजेक्शन महापालिकेने मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी वापरले. उर्वरित रेमडेसिवीर इंजेक्शन मेल्ट्रॉनमधील स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले होते. याच स्टोअर रूममधून 48 रेमडेसिवीर इंजेक्शनचा एक अख्खाच्या अख्खा बॉक्सच गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
समाधानकारक खुलासा नसल्यास होणार गुन्हा दाखल
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्टोअर रुम इन्चार्जसह पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून 24 तासांच्या आत खुलासा मागवण्यात आला आहे. या कालावधीत त्यांच्याकडून खुलासा मिळाला नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे.
मंगळवारी जालना येथील टोळीचा झाला होता पर्दाफाश
जालना येथील कोविड सेंटरमधून लंपास केलेली रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या भावाने विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कालच (दि. 27 एप्रिल) पर्दाफाश केला होता. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून या सात जणांमध्ये जालना कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ताजा असतानाच औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्टोअर रूममधून 48 रेमडेसिवीर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा - Special : वर्षभरात कोरोनाबाधित गर्भवती महिलांचे ९९ टक्के शिशु कोरोनामुक्त
हेही वाचा - रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे पोलिसांच्या ताब्यात