औरंगाबाद - शेजारी राहणाऱ्या दुकानदार महिलेने शाळेत येऊन वर्गमित्रांसमोर ५० रुपये चोरल्याचा केलेला आरोप सहन न झाल्याने सहावीत शिकणाऱ्या (वय १२) विद्यार्थ्याने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शिवाजी नगर भागात घडली असून मृत विद्यार्थ्याचे नाव सुरज क्षीरसागर असे आहे. या प्रकरणी सुरजच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पुंडलिकनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुरज क्षीरसागर हा सहावीच्या वर्गात होता, तो गुरुवारी शाळेत जाण्यापूर्वी घराशेजारी असलेल्या किराणा दुकानात गेला होता. त्या नंतर परीक्षा असल्याने तो बहिणीसोबत शाळेत गेला. मात्र, त्यानंतर शेजारी किराणा दुकान चालवणारी महिला सरला धुमाळ यांना सुरजने गल्ल्यातील पैसे चोरल्याचा संशय आल्याने धुमाळ यांनी सुरजच्या शाळेत जाऊन सर्वांसमोर सुरजला जाब विचारला. त्याने माझे पैसे चोरले असा आरोप केल्याने सुरजला शाळेत मित्रांसमोर अपमान झाल्याचे वाटले. तो शाळेतून निघून गेला. त्यानंतर तो परत शाळेत आला होता. मात्र, महिला शाळे जवळच असल्याने तो परत पळून गेला, व त्यानंतर त्याने शिवाजीनगर येथील रेल्वे रुळावर रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली, अशी तक्रार सुरजच्या कुटुंबीयांनी दिली आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज हा नेहमी त्या किरणा दुकानात जायचा तो संस्कारी आणि अभ्यासात अत्यंत हुशार होता. सरला धुमाळ यांच्या सोबत तो नेहमी दुकानात असायचा. मात्र, अचानक सरला धुमाळ यांनी शाळेत जाऊन केलेला चोरीचा आरोपा त्याला सहन झाला नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आई वडिलांनी केला. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई ला मोठा मानसिक धक्काच बसला आहे. ज्या मुलासाठी क्षीरसागर दाम्पत्य मोलमजुरी करत होते ज्याला मोठे करण्याचे स्वप्न पाहून सुरजच्या शिक्षणासाठी शहरात आले होते. तोच काळजाचा तुकडा असा दुर्दैवीरित्या सोडून गेल्याने या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माझा मुलगा परत आणून द्या असा टाहो आई फोडत आहे.
चोरीचा आरोप झाल्यावर लहान मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, लहान मूल आत्महत्या करण्याचे पाऊल उचलत असल्याने मुलांची मानसिकता बिघडत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.