पैठण (औरंगाबाद) - दिवसेंदिवस पैठण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. प्रशासनासमोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाबधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी (९ जुलै) एकूण ३६ स्वॅबपैकी २५ स्वॅब निगेटिव्ह आले तर ११ जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.
शहराच्या वेगवेगळ्या भागात ११ कोरोनाबाधित मिळाल्याने शहर व तालुक्यात कोरोनाबधितांची संख्या ५९वर पोहोचली आहे. तर २२ जण कोरोनामुक्त झाले असून, चार बधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 15 दिवसात शहरातील दारूसलाम, कुंभारवाडा, कापड मंडई, लक्ष्मीनगर नवीन कावसन, नारळा, गोदावरी कॉलनी, करडी मोहल्ला येथे रुग्ण सापडल्याने कोरोना आजार हा शहरात पसरला असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी पैठण शहरातील कुंभारवाडा भागातील एकाच घरातील ६ व्यक्तींना लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. तर लक्ष्मीनगर-१ व करडी मोहल्ला येथे -३ व्यक्तींना लागण झाली आहे.
अँटीजेन रॅपीड टेस्टमुळे दिलासा....
दारूसलाम-कुंभारवाडा परिसरात आज आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाकडून वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता अँटीजेन रॅपीड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. यावेळी दारूसलाम मोहल्ला येथील कंटेनमेंट झोन व परिसरातील १९ तर परदेशी पुरा येथील ५ जणांची टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वच्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी व प्रशासनाने सुटकेचा निः श्वास सोडला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे व तहसीलदार चंद्रकांत शेळके, मुख्यधिकारी सोमनाथ जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ हे जातीने लक्ष देऊन होते.