औरंगाबाद - ऐतिहासिक वेरूळ लेणीतील दहाव्या क्रमांकाच्या बौद्ध लेणीच्या मूर्तीवर पडणारा किरणोत्सव सोहळा पर्यटकांसह भाविकांना अनुभवयास मिळाला. वर्षभरातून काही दिवसच हा सोहळा पाहवयास मिळतो. यासाठी पर्यटक आवर्जुन या लेणीला भेट देतात.
स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत एकूण ३४ लेण्या असून यामध्ये १२ बौद्ध लेणी आहेत. यातील १० क्रमांकाची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेण्या ह्या विहार आहेत. यातील १० नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हिच सूर्यकिरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर शनिवारी आली. पुढील ५ ते ६ दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येईल.
महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे. यामध्ये वज्रयानाची काही शिल्पे पहावयास मिळतात. यालाच सुतार की झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिरही म्हणतात. गुजरातमधील लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून येथे नमन करतात. याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथातही आहे. गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधीवृक्षाखाली (पिंपळ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी आरतीला बोलविण्याची प्रथा होती.