अमरावती - जिल्ह्यातील परतवाडा ते चिखलदरा रस्त्याचे सध्या बांधकाम सुरू आहे. परंतु, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम थांबवावे, अशी मागणी करत आज परतवाडा शहर युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने काम बंद पाडत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या वाहनावर दगडेफक करून आठ ते दहा कार्यकर्त्यांनी कामगारांनाही बेदम मारहाण केली.
युवा स्वाभिमान पक्षाने दीड महिन्यांपूर्वी परतवाडा ते चिखलदरा रस्त्याच्या सुरू असलेल्या निकृष्ट बांधकामाविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. खासदार नवनीत राणा यांच्याकडेदेखील तक्रार केली होती. परतवाडा ते चिखलदरा रस्त्याच्या कामासाठी लागणारा माल हा सिपना नदीमधून काढला जात आहे. तसेच कामासाठी लागणारी गिट्टी हे माती मिश्रत असल्याचा आरोपदेखील आंदोलकांनी केला आहे. या कामाच्या तक्रारीची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नसून अधिकारी आणि जांडू कंत्राटदार यांचे साटेलोटे असल्याचे कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. आज आम्ही शांततेत आंदोलन करत असताना कंत्राटदाराच्या कामगारांनी हुज्जत घातल्याने आंदोलन तीव्र झाल्याच आंदोलकाचे म्हणणे आहे. मात्र, कामगारांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील चौकशी सुरू आहे.