अमरावती - मागील दोन वर्षे कमी पडलेल्या पावसामुळे जमीन कोरडी झाली होती. यावर्षी तर संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भटकत होता. राज्यभरातून येणाऱ्या दुष्काळाच्या बातम्या पाहून धास्तावलेल्या अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात कधी दुष्काळाला शिरकावच करू नये, तसेच भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पाणीदार गाव करण्याचा लढा उभारले.
गावातील काही सामाजिक कार्यकर्ते योगेश लोखंडे यांच्या पुढाकाराने काही तरुण एकत्र आले. नंतर व्हाट्सअॅपच्या ग्रुप तयार करण्यात आला. त्या ग्रुपचे नावही "गाव पाणीदार करणारच", असे ठेवले आहे. दिवसरात्र भर उन्हात मेहनत करून गावकऱ्यांनी श्रमदान करत गावाच्या भोवताली असलेल्या जागेत खड्डे खोदून पाणी जिरवण्यासाठी व पाणी अडवण्यासाठी बांध तयार केले. यात आता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात केलेल्या श्रमदानाची फलश्रुती पडलेल्या पावसाळ्यात अनुभवता आली. सध्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची, गावातील विहिरींसह बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
संत अच्युत महाराज यांची कर्मभूमी असलेल्या ४ हजार लोकवस्तीच्या शेंदूरजना बाजार येथील नागरिकांनी एप्रिल व मे या २ महिन्यात भर उन्हात श्रमदान केले. गावाच्या भोवताली असलेल्या पडीक जागेवर श्रमदान करून पावसाचे पाणी जमिनीत जीरवण्यासाठी खड्डे खोदले. दऱ्या-खोऱ्यातील पाणी एकत्र येऊन या खड्ड्यात साठले. आता पावसाळ्यात या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे गावाशेजारील शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. सोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमचा मिटला आहे.
गाव पाणीदार करण्यासाठी अनेक गावे शासनाच्या अनुदानावर अवलंबून असतात. परंतु, या गावातील तरुणांनी स्वतः वर्गणी व गावाबाहेर नोकरीवर असणाऱ्या ग्रामस्थांनी आर्थिक हातभार लावला. आता या तरुणांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती शासनाच्या अनुदानाची, मार्गदर्शनाची, तरुणांच्या पुढाकाराने तर गाव पाणीदार झालेच पण, जिल्ह्यासह राज्याला एक आदर्श उभे करून दाखवले.