अमरावती - सध्या सर्वत्रच तरुण पिढी नोकरीच्या पाठीमागे धावताने मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र इतर व्यावसायाकडे वळताना त्यांचा कल फारसा दिसून येत नाही. त्यामध्ये शेती व्यवसाय करणाऱ्याची संख्या अत्यल्प आहे. मात्र, चिखलदरा तालुक्यातील एका तरुणाने उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण खरी करून दाखवली आहे. दुर्गम भागात देखील आहे त्या उपलब्ध साधनांच्या सहाय्यान योग्य पद्धतीने नियोजन करून चिखलधरातील मोथा गावातील तरुणाने १० गुठ्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करून ३ लाखांचे उत्पादन घेतले आहे. त्याच्या या यशस्वी शेतीचा विशेष आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी..
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात दरवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होतो. परंतु हा भाग उंच डोंगर दऱ्यांचा असल्याने पाणी साठवण्याची क्षमता या भागात नाही. त्यामुळे चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांत दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला येथील लोकांना सामोरे जावे लागते. चिखलदारा पासून पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या मोथा गावाची ही अशीच भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे मोथा गाव हे टँकरग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. परंतु याच मोथा गावातील उच्चशिक्षित युवा शेतकऱ्यांने तरुणा समोर एक यशस्वी आदर्श ठेवला आहे. केवळ एक हेक्टर शेतामध्ये त्याने स्ट्रॉबेरी, गहू कोबी, लसून, वांगी, टमाटर, मिरची आदी पिके घ्यायला सुरुवात केलेली आहे. केवळ १० गुंठे स्ट्रॉबेरी शेतीत गजानन शनवारे हा उच्चशिक्षित शेतकरी ३ लाखाचे उत्पादन घेत आहे.
पारंपरिक शेतीमध्ये बदल-
गजानन शनवारे या तरुणांकडे वडिलोपार्जित एक हेक्टर शेती आहे. गजानन हा उच्चशिक्षित आहे. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो शेती कडे वळला पूर्वी तो आपल्या शेतील सोयाबिन, तूर,आणि हरबरा सारखे पारंपरिक पिके घेत होता.मात्र पाण्याची कमतरता आणि निसर्ग साथ देत नसल्याने त्याने पारंपरिक शेतीला फाटा देण्याच ठरवलं. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे महाबळेश्वरच्या धर्तीवर येथेही स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते, या उद्देशाने मागिल पाच वर्षा पूर्वी श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाने प्रायोगिक तत्ववार काही ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यात गजानन यांच्या शेतीचा समावेश होता. पहिल्याच वर्षी कमी पाण्यात चांगले उत्पादन झाल्याने आता पुढेही स्ट्रॉबेरीचीच शेती करायची असे गजानन शनवारे यांनी ठरवले आणि आज पाच वर्षांपासून ते यशस्वी रित्या स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत.
या स्ट्रॉबेरी शेतीसाठी गजानन याना एक लाखाचा खर्च येतो. मात्र, यातून ते तीन लाखांचे उत्पन्न घेत आहेत. गजानन हा उच्चशिक्षित असून शासकीय नोकरीसाठी काही वर्षे प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे त्याने येथील हवामानाचा अंदाज घेत स्ट्रॉबेरी शेती करण्याचा विचार केला. चिखलदरा हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे राज्यभरातून येणार्या पर्यटकांसाठी येथील स्ट्रॉबेरी हा आकर्षणाचा विषय ठरला आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी खरेदी करतात. त्यामुळे येथील युवा शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून चांगला रोजगार मिळत आहे.
केवळ १० गुंठ्यांत स्ट्रॉबेरी शेती-
गजानन शनवारे यांच्याकडे एकूण एक हेक्टर शेती आहे. या शेतीत केवळ १० गुंठे शेतजमिनीतच ते स्ट्रॉबेरीची लागवड करतात. त्यासाठी पूर्ण खर्च १ लाख येतो. तर उत्पादन तीन लाख रुपयांपर्यत जात असल्याचा दावा या उच्चशिक्षित तरुणाने केला आहे. ठिंबक सिचनच्या माध्यमातून कमी पाण्याच्या वापरातून गजानन हे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहेत.