अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथे शनिवारी सायंकाळी चक्रीवादळी वाऱ्याच्या तडाख्याने अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. घुईखेड- मोगरा रस्त्याववरील मोठी झाडे पडली. या चक्रीवादळामुळे मोठी वित्तहानी झाली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथे शनिवारी जोरदार वादळी वारा आले. यामध्ये येरड येथील सुधीर हसतबांधे, प्रकाश बोरकर, उमेश मोकाशे, लक्ष्मी गुजर यांच्या घरावरील आणि अरविंद मडावी यांच्या पानठेल्यावरील टिन पत्रे उडाले. काही घरांची कंपाऊंड भिंत वादळी वाऱयामुळे पडली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे टिन पत्रे उडालेल्या नागरीकांच्या घरातील साहित्याचे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतातील पाईप व इतर काही साहित्य उडाले आहे. येरडजवळून काही अंतरावर गारा सुध्दा पडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घुईखेड ते मोगरा हायवे रस्त्यादरम्यान मोठी झाडे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. येरड (बाजार) मध्येही अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. येरडमधील विद्युत पुरवठा २० तासांपासुन सुरू झाला नव्हता.