अमरावती - पावसाळ्यापूर्वी खड्डे दुरुस्तीसह जिल्ह्यातील आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. वनविभागाच्या परवानगीसह इतर कुठल्याही अडचणी आल्यास तत्काळ कळवावे. सरकारकडे आपण स्वत: पाठपुरावा करू. मात्र, जिल्ह्याच्या रस्ते विकासात अडथळा येता कामा नये , असे सुस्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील रस्ते विकासाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत व इतर विविध योजनांतील रस्त्यांचा समग्र आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. रस्ते विकासासाठी वनविभागाची परवानगी किंवा इतर कुठलीही अडचण आल्यास तत्काळ निदर्शनास आणून दिली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. विभागांनी माहितीचे परिपूर्ण सादरीकरण वेळोवेळी केले पाहिजे. आपण स्वत: मुख्यमंत्री व वन मंत्र्यांकडे पाठपुरावा करू. मात्र, जिल्ह्यातील रस्तेविकास थांबता कामा नये.
लॉकडाऊनमध्ये विकासकामांची गती काहीशी मंदावली असली तरीही पावसाळा लक्षात घेता प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करावीत. मेळघाटात अनेक कामे प्रलंबित आहेत. तेथील पूल, रस्ते दुरुस्ती तत्काळ करून घ्यावी. दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटता कामा नये. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात संभवतात. तसे घडता कामा नये. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती तत्काळ करून घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पर्यावरण सुरक्षेसह रस्ते विकास हवा
अमरावती शहरात रस्ता रूंदीकरण करताना काही जुनी झाडे कापण्यात आली. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, की अशी कृती करण्यापूर्वी आपल्याला, तसेच जिल्हा प्रशासनाला कल्पना द्यायला हवी होती. वृक्षसंपदा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून नागरिकांनी ती कष्टपूर्वक जोपासलेली असते. त्यामुळे असे होता कामा नये. आपल्याला पर्यावरण सुरक्षेसह रस्तेविकास करायचा आहे. त्यामुळे रस्ता रूंदीकरणाच्या कामात दक्षता बाळगली पाहिजे. आता त्या ठिकाणी पुन्हा विविध वृक्ष लावावेत व ते जोपासावेत. एकाच प्रकारची झाडे लावू नयेत. वृक्षसंपदेतले वैविध्य जोपासावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
अमरावती- चांगापूर- वलगाव, अंजनगाव- दर्यापूर- म्हैसांग, वलगाव- दर्यापूर या रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करावी. अमरावती- कौंडण्यपूर रस्त्याच्या कामालाही गती द्यावी. परतवाडा- चिखलदरा रस्त्याचे वनेतर क्षेत्रातील काम सुरु झाले आहे. मात्र, वनांतर्गत कामांच्या परवानग्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करावा, अमरावती- अचलपूर या चौपदरी रस्त्याचा डीपीआर दाखल करावा. त्याचप्रमाणे, रिद्धपूर- तिवसा, चांदूर रेल्वे- तळेगाव या रस्त्यांची कामेही गतीने पूर्णत्वास नेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
शेंडगाव विकास आराखडा, विद्यापीठातील अभ्यासिका, रुग्णालयांचे बांधकाम व सुरु असलेली इमारतींची कामे प्राधान्याने पूर्ण करावी. दर्यापूर येथे सा. बां. विभागाचे विश्रामगृह निर्माण करण्याबाबत प्रस्ताव द्यावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सुरू असलेली कामेही लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.