अमरावती - राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आणि चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन म्हणजे केविलवाणा प्रकार असल्याचे प्रतिउत्तर यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरणी यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने तीन महिन्यांनी शिक्षा सुनावल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे.
अगोदर अमित शाहांनी राजीनामा द्यावा -
यशोमती ठाकुरांनी भाजपाला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. माझ्यावर लावलेले गुन्हे हे राजकीय आकसापोटी लावण्यात आले आहेत. नावावर गंभीर गुन्हे असताना कित्येक भाजपा नेते मोकळे फिरत आहेत. चंद्रकांत पाटलांनी अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राजीनामा मागावा, नंतरच मला राजीनामा मागावा. भाजपाच्या लोकांना मला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी भाजपावर टीका केली.
हेही वाचा - 'यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही'
मुख्यमंत्र्यांना वाटते भीती -
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी मागील काही दिवसांपासून भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. आज सकाळी अमरावती जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात तिवसा येथे आंदोलन करण्यात आले. यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेतला तर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे यशोमती ठाकुरांचा राजीनामा घेत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. ठाकूर यांनी राजीनामा द्यावा. त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली असताना मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.