अमरावती : नेत्रदानाला सर्वात क्षेष्ठदान म्हटले जाते. या कोणाला नेत्र मिळाले तर त्याला नवीन जीवन मिळत असते. हे दान करण्यात राज्यातून पुणे जिल्हा आघाडीवर आहे. राज्यातील नेत्रदान करणाऱयांची संख्या आणि ज्यांना नवीन दृष्टी मिळाली आहे त्याची आकडेवारी समोर आली आहे. नेत्रदान आणि नेत्र प्रत्यारोपणात महाराष्ट्रातून पुणे जिल्हा आघाडीवर दिसत आहे. पुण्यानंतर मुंबईचा दुसरा क्रमांक आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे. अहदनगर जिल्ह्यात सर्वात कमी नेत्रदान झाले असून येथे 143 जणांना दृष्टी मिळाली आहे.
अशी आहे आकडेवारी : पुण्यामध्ये एकूण 11 आय बँक असून यापैकी 5 आय बँक या वर्षभर सक्रिय होत्या. या आय बँकच्या माध्यमातून एकूण 945 जणांनी नेत्रदान केले. यापैकी 646 दृष्टीहिनांना दृष्टी मिळाली. पुण्याच्या पाठोपाठ मुंबईमध्ये एकूण 33 आय बँकपैकी सक्रिय असणाऱ्या 12 बँकद्वारे 814 जणांनी नेत्रदान केले. यापैकी 500 जणांवर नेत्रारोपण करण्यात आले. ठाण्यामध्ये असणाऱ्या एका आय बँकद्वारे 542 जणांचे मरणोत्तर नेत्र घेण्यात आले. यापैकी 341 जणांना दृष्टी मिळाली आहे. नागपूरमध्ये 11 बँकेद्वारे 403 जणांना नेत्रदान केले. यापैकी 135 जणांना या नेत्रदानाचा लाभ मिळाला आहे. सांगलीमध्ये एकूण 10 नेत्र पेढ्या सक्रिय असून वर्षभरात 212 जणांनी नेत्रदान केले असून 121 दृष्टिनांना याचा लाभ झाला. नासिकमध्ये 12 आय बँकद्वारे एकूण 180 जणांनी नेत्रदान केले असून 106 दृष्टिनांना हे नेत्र मिळाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सहापैकी सक्रिय असणाऱ्या तीन बँकद्वारे 135 जणांनी नेत्रदान केले असून याचा लाभ 143 दृष्टीने मिळाला.
नेत्रदान करायचे आहे तर : नेत्रदान करण्यासाठी ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे डोळे लगेच बंद करावे लागतात. त्यानंतर डोळ्यांवर ओल्या कापसाचे बोळे ठेवावेत. डोक्याखाली दोन उषा ठेवायच्या. घरापासून जी सर्वात जवळ नेत्र पिढी आहे, त्यांना याबाबत संपर्क करावा. संबंधित व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत एमबीबीएस डॉक्टरचे प्रमाणपत्र नेत्रदानापूर्वी मिळवणे आवश्यक आहे. नेत्रपेढीचे पथक आल्यावर ते नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करून या नेत्रांचे प्रत्यारोपण दुसऱ्या व्यक्तीला त्वरित करण्यासाठी ते पुढच्या प्रक्रियेला लागतात, अशी माहिती दिशा नेत्रपेढीचे संचालक आणि आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष स्वप्निल गावंडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. कुठल्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. नेत्रदान हे मृत्यूनंतर सहा ते आठ तासात करता येते. ज्या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झाला त्या ठिकाणी रक्तपेढीचे प्रतिनिधी येतात. मृत व्यक्तीचे डोळे काढण्याची प्रक्रिया ते मृत व्यक्तीच्या घरीच करतात.
यांचे नेत्रदान अशक्य : ज्या व्यक्तीचे नेत्रदान करायचे आहे, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळणे हे नेत्रदानासाठी अतिशय आवश्यक आहे.
जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण कळले नसेल तर त्या व्यक्तीचे नेत्र घेतले जात नाही. यासोबतच मेंदू संदर्भातील विकार, मेंदूज्वर, रक्ताचा कर्करोग, मेंदूला आलेली सूज, याकृताला आलेली सूज, कोरोना, रेबीज, क्षयरोग, एचआयव्ही अशा एकूण विविध 20 आजारांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना नेत्रदान करता येत नाही. अनेकांना कोणत्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते आणि कोणत्या व्यक्तीचे करता येत नाही याची माहिती नसल्यामुळे अनेकदा एखाद्या मृत व्यक्तीचे डोळे घेऊन ते कुठल्याही उपयोगात येत नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि नेत्रपेढीच्या प्रतिनिधींनी खात्री करूनच संपूर्ण प्रक्रिया करावी. स्वप्निल गावंडे, आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष