अमरावती - शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नसल्याने सोबतच वरुड-मोर्शी मतदारसंघातील अनेक ठिकाणचे विजेचे रोहित्र बंद असल्याने संतप्त झालेल्या आमदार देवेंद्र भुयार यांनी काही महिन्यांपूर्वी वीज वितरण अधिकाऱ्यांचे कार्यालय पेटवून देण्याची जाहीर धमकी दिली होती. दरम्यान, आता दाभी सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरा, अन्यथा डायनामाईट लाऊन धरणाचे सर्व गेट फोडून टाकू, असा धमकी वजा इशाराच वरुड-मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी जलसंपदाच्या विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिला आहे.
'शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या' -
दाबी सिंचन प्रकल्प हा शंभर टक्के भरा, नाहीतर धरणाच्या पाझरामुळे व पाण्यामुळे बाधित झालेल्या संत्रा झाडांना तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, या मागणीसाठी आमदार देवेंद्र भुयार हे जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी अनेक शेतकरीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी आमदार भुयार यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. तसेच येत्या 15 दिवसांत दाभी धरण तुम्ही शंभर टक्के भरले नाही, तर धरणाचे गेट डायनामाईट लाऊन फोडून टाकेल, असा धमकी वजा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला.