अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावात भीषण पाणीटंचाई आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या मूळ गावातील हे वास्तव आहे. सूर्योदय झाला, की पाण्यासाठी रोजचा संघर्ष, हा येथील महिलांच्या आयुष्याचा जणू एक घटकच झाला आहे.
सावंगी मग्रापूर हे १ हजार ७०० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला आधी २० दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. परंतु, आता गावात प्रशासनाने सुरू केलेल्या एका पाण्याच्या टँकरवर ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत आहे. टँकरद्वारे टाकीत पाणी टाकले जाते आणि मग गावाला पाणीपुरवठा होतो. तर जयहिंद क्रीडा मंडळ या सामाजिक संस्थेकडूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावाला २ दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी पुरेसे पाणी मिळणेही या गावात कठीण झाले आहे.
गावातील महिलांना दरोरोज ४ किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. उन्हाचा पारा जोरदार तापत असला तरी जीवाची पर्वा न करता येथील महिला पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करतात. गावातील पाण्याच्या मुख्य स्रोतांना कोरड पडली आहे. त्यामुळे या गावात केवळ यावर्षीच नाही, तर कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.
या गावात ग्रामपंचायतचे १७ बोअरवेल आहेत. पण ते कोरडेच. पाणीपुरवठा योजनेच्या ७ विहिरी आहेत. तर त्याही कोरड्याच. त्यामुळे ग्रामपंचायतने ३ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामुळे या गावाला पाणी एखाद्या ऑक्सिजनप्रमाणे मिळत आहे. गावाशेजारी असलेल्या पीर बाबांच्या दर्ग्यावर सकाळपासून माहिलांची पाण्यासाठी गर्दी पडते.
शेतीला जोडधंदा म्हणून या गावातील बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. परंतु, शेतात जनावरांसाठी चारा नाही आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने येथील नागरिकांना पशूधन विकावे लागत आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या गावातील हे भीषण वास्तव मन हेलावून टाकणार आहे. त्यामुळे प्रशासन आतातरी मंत्री महोदयांच्या गावासाठी उपाययोजना करून मुबलक पाणी उपलब्ध करून देणार का? की आणखी पुढील कित्येक वर्षे या गावातील लोकांना या पाणीटंचाईचा सामना करावा लागेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल.