अमरावती - पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा अवधी उलटून गेल्यानंतरही विभागात समाधानकारक असा पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाच्या तुरळक हजेरीमुळे अमरावती विभातील चार जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघु अशा एकूण 503 जलसाठ्यात भर पावसाळ्याच्या ऋतुतही केवळ साडेतेरा टक्केच जलसाठाच शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यातही अशीच परिस्थिती राहली तर पिण्याच्या पाण्यासह शेतीचाही प्रश्न गंभीर होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या अनेक गावातील महिला पाण्यासाठी पायपीट करत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
मागील वर्षी झालेला असमाधानकारक पाऊस, अशातच यावर्षीसुद्धा जून महिना कोरडाच गेला. अमरावती विभागातील अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलढाणा या पाच जिल्हयात 9 मोठे, 24 मध्यम आणि 469 लघू जलप्रकल्प आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या मध्यंतरी या प्रकल्पात जवळपास 30 ते 40 टक्के जलसाठा जमा होत असतो. विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात 0 टक्के जलसाठा आहे तर, अकोल्याच्या काटे पूर्णा प्रकल्पात केवळ 4 टक्के जलसाठा आहे. मागील महिन्यात अमरावतीच्या अप्पर वर्धा प्रकल्पात असलेला 13 टक्के जलसाठा हा जुलै महिन्यात 11.80 टक्यावर आल्याने पावसात पाणीसाठा वाढण्याऐवजी कमी होतानाची चिन्हे दिसू लागली आहे.
मागील आठवडाभरापासून अमरावती जिल्ह्यात पावसाने चांगलीच दडी मारली. आता उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेक भागात पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आव्हान देऊन उभे ठाकले आहे. जुलै महिन्याचे दोन आठवडे होऊनही अनेक भागात समाधानकारण पाऊसच झाला नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहे. जिथे पेरणी झाली तेथील शेतकऱ्यांना आता पिके जगवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यातच शेतातील विहिरीत पाण्याची पातळी ही नसल्याने सिंचन पद्धतीनेसुद्धा शेतकरी पाणी देऊ शकत नाही. त्यामूळे शेतकरी हतबल झाला असून पावसाची वाट पाहात आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.