अमरावती Meditation Center In Melghat : मनाची एकाग्रता साधून त्याद्वारे आपल्या स्वभवतालच्या जगाचं स्वनिरीक्षणाद्वारं स्वतःची आत्मशुद्धी करण्यासाठी, भगवान गौतम बुद्धांनी (Gautam Buddha) शोधून काढलेल्या 'विपश्यना' (Vipassana) अर्थात, खास ध्यान पद्धतीद्वारे जागतिक सत्याचा अनुभव घेता यावा यासाठी 'ध्यान साधना' महत्त्वाची आहे. ही ध्यान साधना खऱ्या अर्थाने साधण्यासाठी मेळघाटात एक तपापासून या ध्यान साधनेचं प्रशिक्षण दिलं जातं. चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या बिहाली येथे उंच पहाडांच्या मध्ये अतिशय शांत ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीनं धम्म प्रशिक्षण केंद्र चालविलं जातं आहे.
मनुष्य आत्ममग्नतेतून बाहेर पडण्यासाठीची ही चळवळ : आम्ही मनुष्यमात्राला पूर्णत्वाकडे नेण्याची तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आमची तयारी आहे. 'असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य (Dr. Babasaheb Ambedkar) आहे. या वाक्यानुसार ही चळवळ समोर आली आहे. या चळवळीच्या माध्यमाने मनुष्य आत्ममग्नता आणि आत्ममुक्ततेतून बाहेर कसा पडेल, मनुष्य स्वतःविषयी कसा जागृत होईल, तो स्वतःसह सर्वांसाठी उच्च उत्क्रांतीसाठी सहाय्यक कसा ठरेल, यासाठी 'ध्यान साधना' आवश्यक आहे. या ध्यान साधनेसाठी आम्ही या केंद्रात येणाऱ्यांना मार्गदर्शन करतो, अशी माहिती बिहाली येथील अचल भूमी धम्म प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, धम्मचारी विवेक चित्त यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.
ध्यान साधनेला महत्त्व : ध्यान साधना केंद्रात येणाऱ्या विविध वयोगटातील व्यक्तींना विविध स्वरूपात ध्यान साधनेचे प्रशिक्षण दिलं जातं. महिलांसाठी विशेष साधना केंद्र तसेच युवकांसाठी युवा संस्कार शिबिर, यासह वृद्ध काळात स्वतःची स्वतः कशी काळजी घ्यावी, यासाठी देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. विपश्यनासाठी जाणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक तयारी देखील या 'ध्यान साधना' शिबिरात करून घेतली जाते. समुपदेशनामुळं या ठिकाणी अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक समस्या देखील मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो. या केंद्रात आल्यावर एकमेकांशी होणाऱ्या संवादाच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक समस्या सहज सुटतात.
ध्यान केंद्रासाठी जमीन मिळाली दान : 'बिहाली' हे मेळघाटात प्रवेश केल्यावर धारणीकडे जाताना लागणारे पहिले गाव आहे. या गावापासून काही अंतरावर भीमराव ठवरे यांचं शेत आहे. बिहालीचेच मूळ रहिवासी असणारे भीमराव ठवरे हे कोतवाल होते. त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीनं ध्यान प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी भीमराव ठवरे यांनी आपली शेत जमीन दान दिली. तसंच या ध्यान केंद्र परिसरात पाण्याच्या टाकीसाठी भागीरथी शामराव नाथदिवे यांनी आपली जमीन दान दिली आहे. मेळघाटात पाण्याची प्रचंड अडचण जाणवते. आता या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे. या ध्यान केंद्रातील पाण्याचा प्रश्न या टाकीच्या माध्यमातून लवकरच सुटेल असं देखील धम्मचारी विवेक चित्त यांनी सांगितलं. या केंद्राकडे जाताना मध्ये नदी लागते. या नदीवर छोटासा पूल देखील बांधण्यात आला आहे, त्यामुळे या केंद्र परिसरात वाहन सहज जाऊ शकतात.
कपड्याच्या तंबूत झाले पहिले शिबिर : त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना 2009 मध्ये झाली. 2010 मध्ये बिहाली येथे एका सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असतानाच, 2011 मध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच होळीच्या पर्वावर 'ध्यान साधना शिबिर' आयोजित करण्यात आलं होतं. या पहिल्या शिबिरासाठी कापडाचे तंबू या परिसरात उभारण्यात आलं होतं. पहिल्या शिबिरात सव्वा दोनशे शिबिरार्थी सहभागी झाले होते. आज मात्र या ठिकाणी दोन मजली सभागृह तसेच भव्य ध्यान केंद्र, स्वयंपाक गृह, भोजनासाठी भव्य दालन, स्वच्छतागृह असा विस्तार या केंद्राचा झाला आहे. या केंद्राच्या विकासासाठी धम्मचरांकडून येणाऱ्या दानातूनच काम होतं असल्याचं धम्मचारी मनायु यांनी सांगितलं.
हेही वाचा -